Type Here to Get Search Results !

माहूरमध्ये रजा एज्युकेशन ग्रुपतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उर्दू माध्यमातील विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ शिक्षकांसह विविध क्षेत्रांतील यशवंतांचा गौरव

 माहूरमध्ये रजा एज्युकेशन ग्रुपतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

उर्दू माध्यमातील विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ शिक्षकांसह विविध क्षेत्रांतील यशवंतांचा गौरव



माहूर प्रतिनिधी : शरीफ शेख 


 रजा एज्युकेशन ग्रुप, माहूर यांच्या वतीने उर्दू माध्यमातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांच्या पालकांसह विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या व्यक्तींचा सत्कार सोहळा नगीना फंक्शन हॉल येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, ज्येष्ठ शिक्षक तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.


कार्यक्रमास माहूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष हाजी फिरोज कादर दोसाणी, ग्रामीण रुग्णालय माहूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद वसीम, श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वास जाधव, उपमुख्याध्यापक मोहम्मद फारुक आणि डॉ. जुनेद बावाणी उपस्थित होते. सैफ इब्राहिम यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


सन २०२५-२६ मध्ये उर्दू माध्यमातून SSC व HSC परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.


यासोबतच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक म्हणून निवड झालेल्या उमेदवारांचा, डॉक्टर, वकील तसेच भारतीय टपाल विभागासह विविध शासकीय सेवेत निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. माहूरच्या शैक्षणिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्य केलेल्या ज्येष्ठ शिक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.


NET व JEE परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन


कार्यक्रमात सैफ इब्राहिम यांनी NET व JEE परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तयारी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, विषयांच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे आणि नियमित सराव याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीत सातत्य ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमास श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकवृंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, ज्येष्ठ शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते. तसेच माहूर तालुक्यातील पत्रकार बांधवांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.


कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शेख सिराज रजा, अध्यक्ष रजा एज्युकेशन ग्रुप माहूर तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उर्दू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहूर; शेख इरफान, उपाध्यक्ष; शेख कयुम, शोयब खान पठाण, शेख जिशान आणि सय्यद सिराज, सदस्य यांनी सहकार्य केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सईद अली यांनी केले, तर शेख सिराज रजा यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments