वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून ठाण मांडून बसलेल्यांची सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी; १९ गावांतील आरक्षणानंतर राजकीय हालचालींना वेग
श्रीक्षेत्र माहूर : ता. प्र. संजय वडस्कर
माहूर तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे.
तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता माहूर तहसील कार्यालयातील वसंतराव नाईक सभागृहात पार पडली. यानंतर गावागावातील इच्छुकांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुकांनी सरपंचपदासाठी आपापली राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे
. विशेषतः गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या काही जणांनी सरपंचपदासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र अनेक गावांत दिसून येत आहे.
मात्र, वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून संधी मिळाल्यानंतर आपल्या वार्डातील आणि गावातील विकासकामांसाठी नेमके काय योगदान दिले, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे
. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नाली व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या अपेक्षा कायम असताना आता सरपंचपदासाठी विकासाचे आश्वासन देणाऱ्या इच्छुकांकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
आरक्षण सोडतीपूर्वीच काही इच्छुकांनी सरपंचपदाचे 'बाशिंग' गुडघ्याला बांधल्याची चर्चा होती. मात्र आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघणार, यावर अनेकांची राजकीय गणिते अवलंबून होती.
आता आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर कोणत्या गावात कोणत्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळणार, यानुसार स्थानिक राजकारणाची दिशा बदलताना दिसत आहे.
“वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीत पदावर राहूनही विकासाचा ठोस ठसा उमटवता आला नाही, तर आता अचानक विकासाची आश्वासने कशी?” असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जात असल्याची चर्चा आहे.
आगामी निवडणुकीत केवळ आश्वासनांपेक्षा मागील कार्यकाळातील कामगिरी, वार्डातील विकास, मूलभूत सुविधांची स्थिती आणि जनतेशी असलेला प्रत्यक्ष संपर्क याला महत्त्व मिळणार असल्याची चर्चा गावागावांत सुरू आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीची अंतिम तारीख अद्याप जाहीर झालेली नसतानाच आरक्षण सोडतीनंतर माहूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
आगामी काळात कोणत्या गावात कोण सरपंचपदासाठी दावा करणार, कोणते नवे चेहरे पुढे येणार आणि कोणत्या राजकीय समीकरणांना आकार मिळणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments